Total Pageviews

Showing posts with label महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे. Show all posts
Showing posts with label महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे. Show all posts

Tuesday, 20 October 2015

श्री सप्तश्रृंगीमाता वणी

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्रे
श्री सप्तश्रृंगीमाता वणी
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्रे स्थान सप्तश्रृंगी, नासिक जिल्ह्यातील हे स्थान नाशिकपासून ६५ किमी अंतरावर आहे
सप्तश्रृंगगडाचे पायथ्याचं गाव नांदुरी येथून घाटरस्ता सुरू होतो सुमारे दहा किमी अंतराचा हा घाटमार्ग आहे. ह मार्ग संपल्यावर आपण गडाचे पठारावर येऊन पोहोचतो. या पठाराची समुदसपाटी पासून उंची ४७०० फूट आहे.येथे गावठाण आहे. येथे समोर अंगावर येणारा सरळसोट कडा दिसतो. या कड्या मधेच एका प्रचंड दगडी गुहेत सप्तशृंगीचं स्वयंभू स्थान आहे मंदिरात वर जाण्यासाठी पाचशे बांधीव पायऱ्या आहेत. या मूळ पायऱ्यांचं बांधकाम पेशवेकालीन सरदार दाभाडे यांची पत्नी उमाबाई आणि कान्हेरे बंधू यांनी केल्याचे सांगतात .संपूर्ण पायरी मार्गावर छप्पर घातलेले आहे. पायऱ्या चढून गेल्यावर मंदिर आहे. देवीची उभी मूर्ती पूर्वाभिमुख भव्य अतिशय रेखीव असुन. आठ ते दहा फूट उंचीची आहे, अठरा भूजायुक्त मूतीचे हातात विविध आयुधे आहेत. देवीचा डाव्या बाजूचा एक हात कानाला टेकलेला आहे.
या ठिकाण विषयी दंतकथा असुन. मार्कंडेय ऋषी या ठिकाणी तपस्चर्या करीत होते, त्यांचे या तपाने देवी प्रसन्न झाली व तिचे आज्ञे ने त्यांनी या मूर्तीची स्थापना केली. गडावर मार्कंण्डेय ऋषीं आसनस्थ होऊन देवीला तिच्या पराक्रमाचा कथा ऐकवत व देवी किंचित मान वाकडी करुन ऐकत असे. देवीचे हे स्थान लोकांना परिचित नव्हते अनेक शतकापूर्वी या परिसरात धनगर आपली गुरे चरण्यासाठी नेत एका धनगरास येथे मधाचे पोळे दिसले ते काढत असताना त्याला देवीची मूर्ती दिसली व हे स्थान प्रकाशात आले.
गडावर व परिसरात कालीकुंड व सुर्यकुंड, जलगुंफा, शिवतिर्थ, तांबुलतिर्थ, मार्कंण्डेय दर्शन, शितकडा अशी धार्मिक व प्रेक्षणीय स्थळे आहेत.
चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते, नवरात्र उत्सवात अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना झाल्यानंतर सकाळी महापूजा, दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी आरतीचा कार्यक्रम असतो. नवमीच्या दिवशी शतचंडी याग केला जातो. मंदिराच्या मागे असलेल्या गुहेच्या माथ्यावर एक दुर्गम सुळका आहे. त्यावर निशाण चढवणं हा देवीच्या यात्रेतला हा नवरात्रीतला महत्त्वाचा कार्यक्रम असतो. कोजागिरी पौणिमेला लाखो भाविक गडावर येतात.
माहिती संकलन-: निखिल आघाडे
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

Sunday, 18 October 2015

श्री रेणुकामाता माहूरगड

 महाराष्ट्रातील तिसरे पूर्ण शक्तिपीठ 
श्री रेणुकामाता माहूरगड
महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले माहूरगड हे ठिकाण नांदेड जिल्ह्यात आहे. प्राचीन काळी माहूरचे जंगल ‘ अमलीवन ‘ म्हणून प्रसिद्ध होते .माहूर हे प्राचीन किल्ल्याचे ठिकाण, रेणुकामाता, दत्तात्रेय, अनसूयामाता या तीन डोंगरावरील मंदिरांना सामावणारा माहूरचा हा डोंगरकिल्ला गौंड या आदिवासी राज्याचा एकेकाळी सत्तेचे केंद होता. या परिसराला सुमारे ६ मैल तटबंदी आहे, किल्ल्यावर हत्तीदरवाजा, ब्रह्माकुंड, कारंजी, हौद यांचे अवशेष त्याचे गत वैभवाची साक्ष देत उभे आहेत, १४२७ मध्ये आदिवासी गोंडराजाचा पराभव करून अहमदशहाने माहूरगड जिंकून घेतला . तेव्हा येथील मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली, पुढे किल्लेदार जयसिंग ठाकूर याने रेणुकादेवीचा सभामंडप बांधला .
या सभामंडपवजा मंदिरात प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे पुढे देवीची बैठक असुन देवीच्या बैठकीवर सिंहासन कोरलेले आहे या बैठकीवर ५ फूट उंच व ४ फूट रुंद असा रेणुकादेवीचा तांदळा आहे.
या ठिकाणा विषयी अनेक कथा प्रचलित आहेत.
भागीरथीच्या तीरावार कान्यकुब्ज नावाची नगरी होती. त्या नगरीत इश्‍वाकू राज्याचा पुत्र रेणू राजा राज्य करीत होता रेणू राजाने कन्याप्राप्तीसाठी. शंकर-पार्वतीला प्रसन्न करून कन्याप्राप्तीसाठी यज्ञ केला. त्या यज्ञकुंडातून रेणुका प्रगटली. यथावकाश भागीरथीच्या तीरावर रेणुकेचे स्वयंवर झाले व ती तपस्वी जमदग्नीची रेणुका भार्या झाली. ते भागीरथी तीरावरील महोदय या नगरीत राहू लागले. त्यांचे सोबत स्वयंवरात इंद्राने दिलेली कामधेनू हि होती, रेणुकेला वसू, विश्‍वासू, बृहद्‌भानू, बृहत्कन्न आणि परशुराम ही मुले झाली.
रेणुका एकदा नदीवर गेली असता स्त्रियांसह मदनाचे रूप धारण करणाऱ्या गंधर्वाला पाहून तीचे मनात कामूक भाव येतात ही गोष्ट जमदग्नीला कळते तेव्हा ते क्रोधीत होतात व रेणुकेला मृत्युदंडाची शिक्षा देतात व पुत्रांना तिची हत्या करण्यास सांगतात. एकामागून एक चारही पुत्रांनी रेणुकेचा वध करण्याची पित्याची आज्ञा नाकारताच जमदग्नी त्यांना शाप देऊन ठार करतात.
पाचवा पुत्र परशुरामास आज्ञा करतात,पितृ आज्ञा म्हणून परशुराम तत्काळ आपल्या परशुने रेणुकामातेचे शीर धडावेगळे करतो. जमदग्नी प्रसन्न होतात. पितृवचनाचे पालन केल्यामुळे परशुरामास वर मागण्यास सांगतात. मातृभक्त परशुराम आपल्या मातेला व भावंडांना पुन्हा जिवंत करण्याची विनंती करतात. त्यांना क्रोधाचा पश्‍चाताप होतो व ते रेणुका व पुत्रांस पुन्हा जिवंत करतात. व आपला क्रोध त्यागतात. पुढे राजा सहस्त्रार्जुन जमदग्नी आश्रमात येतो. त्याला तेथे असणार्या कामधेनू व तिच्या चमत्काराबद्दल कळते. तो जमदग्नीकडे कामधेनूची मागणी करतो; .पण जमदग्नी कामधेनू देण्यास असमर्थता दर्शवितात. तेव्हा राजा आश्रमावर हल्ला करतो. सर्वांची हत्या करून रेणुकेला जखमी करून कामधेनूला घेऊन जातो
नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला. घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली . पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पाथिर्व व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले . रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर पोहचला . तिथे असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले .या पाण्याने स्नान घालून व तेथेच दत्तात्रेयांचे पौरोहित्या खाली परशुरामाने जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. त्यानंतर परशुरामाला रेणुकेची खूप आठवण येऊ लागली . तो शोक करत होता , तोच आकाशवाणी झाली . ‘ तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल .फक्त तू मागे पाहू नकोस .’ परंतु त्याने मागे वळून बघितले . त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते . तेवढेच परशुरामाला दिसले. त्या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते . परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ठिकाणाला मातापूर नाव मिळाले पुढे त्याचे माहूर झाले.
या परिसरात महाकाली आणि महालक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. खालील बाजूस परशुराम मंदिर, गणपती मंदिर, पांडवतीर्थ , औदुबर झरा, अमृतकुंड, बोधतीर्थ, मातृतीर्थ, रामतीर्थ , ऋणमोचनतीर्थ ही स्थळे आहेत.
माहिती संकलन-: निखिल आघाडे
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

Saturday, 17 October 2015

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

 महाराष्ट्रातील दूसरे शक्तीपीठ 
श्री महालक्ष्मी कोल्हापूर
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी दुसरे व पूर्ण शक्तीपीठ आहे. श्रीमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर या जिल्ह्याचे ठिकाणी आहे .कोल्हापूरला प्राचीनकाळी गौरवाने दक्षिणकाशी म्हटले जाते असे. महालक्ष्मीचे मंदिर कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती परीसरात पश्चिमाभिमुख आहे या मंदिराचे उल्लेख ईस च्या सुरवाती पासून मिळतात. या मंदिराच्या चारी दिशांना प्रवेश दरवाजे आहेत ईस ११७८ ते १२०९ या काळात शिलाहार राजा जयसिंग व राजा सिंघल यांच्या कारकीर्दीत दक्षिण दरवाजा व येथील अतिबलेश्‍वर मंदिर यांचे काम झाले. पश्चिमेकडील प्रवेशद्वाराला ’महाद्वार’ असे म्हणतात ईस 1218 मध्ये यादव तौलम याने हे महाद्वार बांधले. मंदिराबाहेरील खांबांवर केलेलं कोरीव काम अत्यंत रेखीव आहे . मुख्य मंदिरचे काम दगडी असून मंदिर बाहेरुन तारांकित आकाराचे आहे. सध्याच्या मंदिराचा मुख्य भाग इ. स. ६०० ते ७०० या शतका मधील असुन. नवव्या शतकाच्या कालावधीत राजा गंडवादिक्ष याने मंदिराचा जीर्नोधार केला. व येथील महाकालीचे मंदिर बांधले. मुख्य महालक्ष्मी मंदिरास एकूण पाच शिखरे आहेत. मंदिराचे मंडपास अनेक खांब आहेत. मुख्य मंदिराला जोडून गरूड मंडप आहे. मंदिराच्या गर्भगृहात दगडी चबूतऱ्यावर श्रीमहालक्ष्मीची मूर्ती उभी आहे. मूर्ती पश्चिमाभिमुख असून ती चक्रावर उभी आहे, मूर्ती काळ्या रंगाच्या शिलेपासून बनविलेली आहे. मूर्तीची उंची २ फूट ९ इंच असुन मूर्ती चतुर्भुज आहे तिचे वरच्या उजव्या हातात गदा तर डाव्या हातात ढाल आहे. खालच्या उजव्या हातात मातुलिंग व डाव्या हातात पानपात्र आहेत. मस्तकावर मुकुट असून त्यावर शेष नागाने छाया धरली आहे. उत्तराभिमुख योनी व लिंग आहे मागील बाजूस सिंह आहे. मागील बाजूचे चांदीची प्रभावळी वर चंद्रसूर्याच्या दोन आकृत्या आहेत.
महालक्ष्मी विषयी काही कथा प्रचलित आहेंत
गरुडाचल नावाचे एक मुनी आपली कन्या माधवी हिच्यासह एकदा विष्णू चे भेटीस आले, विष्णूने त्यांचा आदर सत्कार केला, बालवयातील माधवी अजाणतेपणे विष्णू जवळ जावून बसली हे पाहून लक्ष्मीला राग आला व तिने तिला घोड्याचे तोंडाची होशील असा शाप दिला.हर ऐकून क्रोधीत झालेल्या गरुडाचलाने लक्ष्मीला तू हत्तीण होशील असा शाप दिला. हत्तीण रूपातील लक्ष्मी येथे आली व तिने पापमुक्ती साठी तपचर्या सुरु केली. ब्रह्मदेवानी तिला पापमुक्त करून तिचे नाव महालक्ष्मी ठेवले
या स्थाना विषयी कोल्हासूर वधाची कथा प्रचलित आहे.
पुरातनकाळी राक्षस कोल्हासुराने या परिसरात अनाचार माजवले होते. देवही त्याचे पुढे हतबल झाले होते देवांनी प्रार्थना केल्यामुळे महालक्ष्मीने त्याच्या युद्धाची तयारी केली. दोघांचं घनघोर युद्ध झालं. शेवटी महालक्ष्मीने बह्मास्त्राने त्याचं मस्तक उडवलं. अश्विन पंचमीस त्याचा वध झाला. मृत्यू समयी त्याने या क्षेत्रास आपले नाव मिळावे असा वर मागितला देवीने वर देताच त्याच्या मुखातून दिव्य तेज थेट महालक्ष्मीच्या मुखात शिरलं. त्याचे नावा वरून या नगरीला कोल्हापूर हे नाव मिळाले.कोल्हासूराच्या वधानंतर आनंदोत्सवात देवदेवता,ऋषीमुनी सर्वजण आले पण त्र्यंबुली देवीला आमंत्रण देण्याचे राहून गेले. हे लक्षात आल्यावर महालक्ष्मी इतर देवतांसह त्र्यंबुलीस पूवेर्कडच्या टेकडीवर भेटायला गेली. त्र्यंबुली रुसली होती. तिची समजूत काढून तिला येण्याची विनंती केली. तेव्हा तू करवीरक्षेत्री जा. माझा राग गेला, पण मी येणार नाही. असं तिने सांगितलं. व तिने तेथेच वास केला
तिरुपतीची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथा ही सांगितली जाते.
मंदिराचा प्रदक्षिणेचा मार्ग जवळपास स्वस्तिकाच्या आकाराचा असून सोळा काटकोनातून प्रदक्षिणा घालावी लागते. मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूला श्रीमहाकाली व श्रीमहासरस्वती या देवींची मंदिरे आहेत.
या परिसरात सूमारे २५० देवी-देवतांची मंदिरे आहेत.
अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापनेपासूनचा नवरात्र उत्सव मोठा असतो. प्रतिपदेला बैठीपूजा, द्वितीयेला खडीपूजा, त्र्यंबोलीपंचमी दिवशी हत्तीच्या अंबारीतील, रथारूढ पूजा, मयुरारूढ पूजा, अष्टमीला महिषासूरमदिर्नी, सिंहवासिनी अशा रूपातील देवीच्या पूजा साकार होतात.
अष्टमीला घागरी फुंकण्या पद्धत आहे मध्यरात्रीपर्यंत धामिर्क सोहळे होतत. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशीही होमहवन, शस्त्रपूजा होते. तिरुपती मंदिराकडून आलेला शालू त्या दिवशी नेसवला जातो. दसऱ्याच्या दिवशी देवी हत्तीच्या अंबारीत बसते. संध्याकाळी तोफेची सलामी मिळाल्यावर देवीची पालखी निघते. दसरा चौकात शिलंगणाचा होणारा हा सोहळा संपन्न होतो. तिथे सोनं लुटण्याचा कार्यक्रम झाल्यावर देवीची पालखी परत मंदिराकडे निघते. व नवरात्र सोहळा संपन्न होतो.
माहिती संकलन-: निखिल आघाडे
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

Tuesday, 13 October 2015

श्री तुळजाभवानी तुळजापूर

 महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे 

भारतीय पातळीवर प्रमुख मानल्या जाणाऱ्या शक्तीपिठात महाराष्ट्रातील तुळजापुर, कोल्हापुर, माहूर, यांचा समावेश होतो. महाराष्ट्रात साडेतीन पीठे असल्याचे मानले जाते, हि साडेतीन शक्ती पिठाची संकल्पना ओंकाराचे साडेतीन मात्रांवर आधारित आहे, या साडेतीन शक्ती पीठांचा परिचय आपण पुढे पाहानार आहोत.


 महाराष्ट्रातील पहिले शक्तिपीठ 
श्री तुळजाभवानी तुळजापूर

तुळजाभवानी माता ही राज्याचे पहिले शक्तिपीठ असून, उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद पासुन २२ किमी अंतरा वर तुळजापूर मध्ये हे मंदिर आहे, सोलापूर शहरा पासुन हे ठिकाण ४४ किमी अंतरावर आहे.
तुळजाभवानी स्थान बालाघाट डोंगर रांगामध्ये वसलेले आहे. तुळजाभवानी मंदिर तुळजापूर गावातील पूर्णतः खोलगट भागात आहे. मंदिरा कडे जाण्यास शहाजीराजे महाद्वार व राजमाता जिजाऊ महाद्वार अशी दोन भव्य महाद्वारे आहेत. खाली उतरून जाण्यास सुंदर घडीव अशा पायऱ्या असून, या पायऱ्यांचे तीन टप्पे आहेत. मंदिरात जाताना डावीकडे तीर्थकुंडे आहेत. पहिला टप्पा संपताच एकशेआठ झऱ्यांचे उगमस्थान असणारे कल्लोळतीर्थ,. दुसरा टप्पा संपल्यावर उजवीकडे गोमुख तीर्थकुंड आहे. तिसरा टप्पा संपल्यावर आपण मुख्य मंदिराच्या प्रांगणात पोहोचतो. येथे उजवीकडे तुळजाभवानीचा नगारखाना आहे. त्यानंतर अवघ्या काही पायऱ्या उतरल्यानंतर देवीचे होमकुंड आहे. होमकुंडाचे मंदिर पुरातन असुन होमकुंड सुमारे दहा फूट लांब – रुंद असून, साधारण सात फूट खोल आहे. होमकुंडावर उजव्या बाजूस गणेशमूर्ती आहे. होमकुंडाच्या पायाशी भैरवाची मूर्ती आहे.
त्यापुढे मुख्य हेमाडपंती बांधणीचे दगडी मुख्य मंदिर आहे. मंदिराचा मुख्य दरवाजा पितळी असून मंडपास सोळा दगडी खांब आहेत , देवीच्या मुख्य गाभाऱ्याबाहेर सभामंडपात बाजूला देवीचे शेजघर आहे. शेजघरा मध्ये देवीचा चांदीचा पलंग आहे. गर्भगृहात तुळजाभवानी मातेची गंडकी पाषाणाची पूर्वाभिमूख महिषासुर मर्दिनी रूपातील मूर्ती चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे. या स्थाना विषयी काही कथा प्रचलित आहेत
प्राचीनकाळी कृतयुगात येथील वनात कर्दम ऋषी पत्नी अनुभूती सह या ठिकाणी राहत होते. कर्दम ऋषींचे मृत्यू समयी अनुभूती गरोदर होती त्यामुळे तिने सह गमन केले नाही पुढे प्रसूती झाल्यानंतर तिने तपश्च्रर्या सुरु केली. तिची तपश्च्रर्या सुरु असताना कुकुटनावाचा राक्षस या परिसरात आला. तपश्च्रर्य मध्ये मग्न अनुभूती त्याला दिसली तिला पाहून त्याची कामवासना अनावर झाली व त्याने तिला स्पर्श केला या स्पर्शाने तिची तपश्च्रर्या भंग पावली समोर कामातुर झालेला राक्षस पाहून तिने देवीचा धावा सुरु केला तीने आपल्या रक्षणासाठी भावभक्तीने केलेला धावा ऐकून त्वरित श्रीदुर्गा पार्वती भवानी माता धावून आली व राक्षसाचा वध केला.व तिला वर दिला व या ठिकाणी भक्त रक्षणा साठी वास केला हाकेला त्वरित धावून आली म्हणून हिचे नाव त्वरिता देवी, पुढे त्वरिताचे तुरजा झाले आणि काळाचे ओघात याचे मराठीत अपभ्रंश रूप म्हणजे तुळजा देवी असे झाले.
प्रभु रामचंद्र वनवासात असताना रावणाने सीतेचे हरण केले, प्रभू रामचंद्र तिचा शोध घेऊ लागले तेव्हा पार्वतीने त्यांची सत्व परीक्षा घेण्याचे ठरविले, व ती सीतेच्या रुपात त्यांचे समोर गेली, रामचंद्रांनी पार्वती मातेला ओळखले व तू का आलीस आई असे विचारले. तेव्हा पार्वतीने तुकाई नाव मिळाले व तिने येथे वास केला. पुढे तुकाई चे तुळजा झाले अशी हि एक लोककथा प्रचलित आहे.
छत्रपति शिवाजी महाराजांनी या आपल्या कुलदेवतेला अर्पण केलेल्या पुतळीमाळेतील प्रत्येक पुतळीच्या मागे राजे शिवाजी अशी अक्षरे कोरलेली आहेत.
देवीच्या सिंहासनाच्या उत्तर बाजूस देवीचे न्हाणी गृह आहे.
मंदिराचे सभोवतालीचे ओवर्या मध्ये जेजुरीचा खंडोबा व इतर देवतांची स्थाने आहेत. तुळजापूर गावात विविध देवी मंदिरे आहेत.
मंदिरात आश्विन शुद्ध प्रतिपदेस घटस्थापना देवीच्या सिंहाच्या सभामंडपामध्ये होते. त्या ठिकाणी ईशान्य दिशेला धान्याची पेरणी करण्यात येते. तेथे नंदादीप असतो. घटस्थापना ते महानवमी या कालावधीत घटाची पूजा होते. देवीस दररोज दोन रोज सकाळ व संध्याकाळ अशी दोन वेळ पंचामृत अभिषेक पूजा केली जाते या पूजा कायमस्वरूपी असतात.
नवरात्रातही त्याच पद्धतीने पूजा चालू असतात. नवरात्रात प्रतिपदा ते अष्टमी कालावधीत रात्री छबिना निघतो. नवमीला घटोत्थापन आणि  दशमीला देवीचे पहाटे सीमोल्लंघन होते.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com