Total Pageviews

Showing posts with label शिवरायांची मंदिरे. Show all posts
Showing posts with label शिवरायांची मंदिरे. Show all posts

Wednesday, 7 October 2015

शिवक्षेत्र श्री "शिखर शिंगणापूर" मंदिर !

छत्रपति शिवाजी महाराज , शंभूराजे आणि समस्त भोसले कुळाचे कुळदैवत
महाराष्ट्राचे आराध्यदैवत माणदेशातील
शिवक्षेत्र श्री "शिखर शिंगणापूर" मंदिर !
शिखर शिंगणापूरची स्थापना सिंघणराजे यादव (१२१० - ४७) या राजाने केली
म्हणून यास काळानुरूप शिंगणापूर हे नाव पडले आहे.
इथल्या डोंगर माथ्यावर एखाद्या शिरपेचा प्रमाणे शोभणारे शंभू महादेवाचे मंदिर
हे माणदेशात सर्वात उंच ठिकाणी वसलेले तीर्थक्षेत्र आहे असे मानले जाते .
हे देवस्थान अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते
तसेच शंभू महादेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील कुलदैवत आहे.
साधारणतः २ एकर परिसरात वसलेल्या या सुंदर मंदिराजवळ पोचण्यास जवळपास शेकडो पायऱ्या चढून जावे लागते.
पायरी मार्गाने येत असताना मध्ये एक जिजाऊ वेशीतून पुढे येऊन सुबक आणि भक्कम शेंडगे दरवाजा ओलांडून
मंदिराच्या प्रवेश द्वाराजवळ पोहचता येते. मंदिराच्या आवारात प्रवेश करताच आपणास समोर नंदी
आणि डाव्या बाजूस नगारखाना पहावयास मिळतो. नंदीच्या दर्शनानंतर मंदिरामध्ये प्रवेश करताना
भगवान शंकरास शरण आलेल्या पार्वतीचे चांदीमध्ये कोरलेले शिल्प आणि त्यापुढे कासवाचे दर्शन घेऊन
मुख्य मंदिरात प्रवेश घेऊन भगवान शंकराच्या पिंडीचे दर्शन होते.
मंदिराच्या गाभाऱ्यात एक भगवान शंकर आणि दुसरे पार्वती आशी दोन लिंग आहेत यांची आहेत.
शिंगणापूरचे हे लिंग स्वयंभू लिंग मानले जाते.
महादेवाच्या या मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंती पद्धतीचे आहे.
या मंदिरास एक मुख्य आणि तीन उप-प्रवेशद्वार असे एकूण ४ प्रवेशद्वारे आहेत.
मंदिराच्या आवारात दोन दीपमळा पाहण्यास मिळतात. मंदिराचे एकूण शिल्पकाम हे अतिशय सुंदर
आणि सुबक असून यातून प्राचीन काळातील उत्तम सुबक शिल्पकलेचा अनुभव घेता येतो.
इ. स. पूर्व बाराशे शतकातील या मंदिराचे सौंदर्य चिरकाल टिकविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी
त्यांच्या कारकिर्दीत जीर्णोद्धार केला. मंदिराचे छत हे एकूण १८ दगडी खांबावरती स्थित आहे.
छताचा विस्तार बाहेरील खांबापासून 3 फूट बाहेर पर्यंत विस्तारित आहे
आणि त्यावर मंदिराचे शिखर स्थितः आहे शिखराच्या समोर सभामंडपाच्या वरती दोन्ही बाजूस
हत्तीचे शिल्प पहावयास मिळते.मंडपामध्ये ३ तांब्या पितळे सजवलेले नंदी आहेत.
मंदिराच्या शिखरावर आणि खांबांवर अनेक देवी देवतांची कोरलेली शिल्पे तसेच
अनेक प्रसंग पहावयास मिळतात. मंदिराच्या आवारात बरीच लहान मंदीरे आहेत
तसेच इथे एक जुनी पंचधातूची मोठी घंटा देखील पहावयास मिळते.
बळी महादेव
मंदिराच्या दक्षीण दरवाज्यातून अमृतेश्वर मंदिराकडे जाता येते , यास "बळी महादेव" म्हणून देखील ओळखले जाते.
या मंदिराकडे पोचण्यासाठी रस्त्याची व्यवस्था देखील आहे, या मंदिराची रचना महादेवाच्या मंदिराप्रमाणेच आहे.
मंदिराचे प्रेवेश द्वार २५ फूट उंचीचे आहे.हे मंदिर चौरसाकार असलेले हे मंदिर गाभाराआणि सभा मंडप असे विभागले आहे.
मंदिराच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेस चौकोनी चबुतरे असून उत्तरेकडून मंडपाकडे जाण्यास मार्गिका आहे.
मंडपाचे छत हे १६ कोरीव दगडी खांबांवर स्थित आहे. रुंद प्रेवशद्वारातून या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रेवेश करता येतो.
मंदिराचा गाभारा चांदणीच्या आकाराचा आहे. मुख्य (महादेवाच्या) मंदिराच्या पश्चिमेकडील दरवाज्यातून
थोड्या अंतरावर एका टेकडीवर छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी महाराज आणि संभाजी महाराज
यांच्या स्मृती स्मारकांचे दर्शन होते.
छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे पुत्र शाहू महाराज यांनी या स्मारकाचे बांधकाम केले.
यामध्ये अनुक्रमे पश्चिमेकडे छत्रपती शिवाजी महाराज, मध्ये शहाजी महाराज आणि पूर्वेला संभाजी महाराज अशी स्थित आहेत.
मंदिराच्या आवारातून दूरवर एक तलाव दिसतो त्यास पुष्कराज तलाव महणून ओळखले जाते
याचे बांधकाम अथवा जीर्णोद्धार शिवाजी राजांचे आजोबा मालोजी राजे यांनी कलेले आहे.
यात्रा :
१२ दिवस चालणाऱ्या शिखर शिंगणापूरच्या यात्रेची सुरवात चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुडी पाढव्याला होते.
पंचमीला पार्वती शंकराला हळद लागते व अष्टमीला रात्री १२ वाजता देवाची लग्न लागते.
हि यात्रा महादेवाच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उमाबनात भरते.
कावड हे या यात्रेचा महत्वपूर्ण भाग मानला जातो.
देवाला अभिषेक घालण्यासाठी विविध ठिकाणाहून पाणी घेऊन कावडी येतात.
या पैकी मनाची कावड ही सासवड इथल्या "भुतोजी तेली" ( तेल्या भूत्याची कावड म्हणून प्रसिद्ध आहे ) यांची असते.
द्वादशीला शिखर शिंगणापूरच्या पायथ्याला पोचून दुपारी ही कावड आतिशय अवघड मुंगी घाटातून डोंगरावर चढवली जाते.
हा सोहळा हा अतिशय वोलोभनीय आणि रोमांचक आसतो यामध्ये वाद्यांच्या तालावर भक्तमंडळी तल्लीन होऊन नाचतात
तसेच खांद्यावरून नेल्या जाणऱ्या कावडींची नयनरम्य अशी रस्सिखाच देखील खेळली जाते.
द्वादशीच्या मध्यरात्री कावडीच्या पाण्याने देवांस अभिषेक घातला जातो.
गुप्तलिंग :
शिखर शिंगणापूर पासून जवळच असलेले हे देवस्थान. भगवान शंकर तपश्चर्येला बसले असता
माता पार्वतीने भिल्लीनीचे रूप घेऊन तपश्चर्या भंग केली तेव्हा महादेव क्रोधीत होऊन
त्यांनी आपली जटा दगडावर आपटली आणि तिथून पाण्याचा प्रवाह प्रकट झाला
हा गोमुखातून पडणारा प्रवाह आजही पाहण्यासा मिळतो. पार्वतीने माफी मागून शंकरास शांती केले
आणि पुढे चैत्र शुद्ध अष्टमी शिखर शिंगणापूर येथे त्यांचा विवाह झाला.
या मंदिराजवळ पायऱ्या उतरून जावे लागते. या ठिकाणाचे दर्शन केल्या नंतरच
शिखर शिंगणापूरची यात्रा पूर्ण झाली असे मानले जाते.
अशा या ठिकाणास भेट देऊन या ठिकाणाचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभव नक्कीच जाणून घ्या.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

श्री शिवराजेश्वर मंदिर (सिंधुदुर्ग)

श्री शिवराजेश्वर मंदिर (सिंधुदुर्ग)
संपूर्ण महाराष्ट्रात फक्त सिंधुदुर्ग किल्ल्यावर आढळणार एकमेव शिवरायांच मंदिर ” श्री शिवराजेश्वर मंदिर” या मंदिराची स्थापना इ.स.१६९५ मध्ये राजाराम महाराजांनी केली होती. या मंदिराच वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील शिवरायांची मूर्ती हि शिवशंकरांच्या रुपात आहे. या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज्यांची जी मूर्ती आहे,  तिच्या डोक्यावर मंदिल आहे. पद्मासनावर बसलेली मूर्ती एका हाताने आचमन करीत आहे तर दुसरा हात गुडघ्यावर आहे. हातात कडे आहे. मूर्तीच्या बाजूला दोन तलवारी, ढाल, जिरेटोप ठेवलेला आहे.
या मंदिराच्या प्रशस्त सभा मंडप पुढे इ.स. १९०६ \ ०७ च्या मध्ये  छत्रपती शाहू महाराजांनी बांधला.
करवीर छत्रपतींच्या वतीने मंदिरात प्रतिवर्षी जिरेटोप, वस्त्रे अर्पण केली जातात. तसेच किल्ल्यावरील शिवरायांच्या हाताच्या ठशाचा चांदीचा छाप बनविण्यात आला असून त्याची नित्यपूजा कोल्हापुरातील जुना राजवाडा येथील भवानी मंदिरात होते.
प्रवास अंतर :
मुंबई - सिंधुदुर्ग. 459 की.मी
पुणे - सिंधुदुर्ग. 356 की.मी
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com

Tuesday, 6 October 2015

जगातील सर्वोत्तम शि‍वस्मारक आंध्रप्रदेशातील श्रीशैलम

जगातील सर्वोत्तम शि‍वस्मारक आंध्रप्रदेशातील श्रीशैलम

महाराष्ट्रातील शिवस्मारक अद्याप कागदावरच राहिलेले आहे. दूर आंध्रप्रदेशात मात्र ३० वर्षांपूर्वीच भव्य स्मारकाचे भूमीपूजन होऊन ते आज अभिमानाने उभे आहे!
ना बड्या घोषणा, ना मोठ्या वल्गना. नाहीत निवडणुकीच्या मोसमातील शिवप्रेमाचे पोकळ उसासे. तरीही केवळ शिवभक्तीच्या ध्यासातून छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील एक (आजच्या मितीला तरी) भव्य राष्ट्रीय स्मारक महाराष्ट्रात नव्हे, तर दूर आंध्रप्रदेशातील कर्नुल जिल्ह्याच्या जंगली पट्ट्यामध्ये आज साक्षात उभे राहिले आहे. बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या श्रीशैलम मंदिराच्या पुरातन भिंतीजवळच या अपूर्व शिवस्मारकाची उभारणी मोठ्या कष्टाने मराठी नव्हे तर तेलगु बांधवांनी केली आहे हे विशेष! आजच्या बांधकाम सामुग्रीचा विचार करता या स्मारकाचे मूल्य दोनशे कोटींच्या वर जाईल. हैदराबादपासून सुमारे अडीचशे किलोमीटर अंतरावर नलमलाई पर्वताच्या रांगांमध्ये आणि घनदाट अरण्यात असे भव्य स्मारक उभारण्याची ज्योत एखाद्याच्या हृदयात पेटावी हेच खरे नवल. १९७४ मध्ये जेव्हा रायगडावर शिवराज्याभिषेकाचे तीनशेवे वर्ष साजरे केले जात होते तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधींसह रायगडावर जमलेल्या लाखोंच्या मेळ्यात मोरोपंत पिंगळे या ऐतिहासिक नावाच्याच एका तेलुगु शिवप्रेमी इसमाच्या डोक्यात ही ठिणगी पडली.
मूळ नागपूरवासी मोरोपंतांनी आपले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खंदे कार्यकर्ते या धर्मकृत्यासाठी सोबत घेतलेच, शिवाय श्री. टी. जी. व्यंकटेश हे काँग्रेसचे माजी मंत्री आणि रायलसीमा केमिकल्स या उद्योग समूहाचे कारखानदार तसेच कै. जी. पुलारेड्डी अशी अनेक पक्षांचे आणि धर्मीयांचे बळकट हात या महान कार्यासाठी एकत्रित आणले. या तेलुगु बांधवांनी 'शिवाजी स्फूर्ती केंद्रम' या संस्थेची प्रथम स्थापना केली. १९८३ साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या दोघांना त्या पवित्र क्षेत्री पाचारण केले. त्यांच्याच हस्ते स्मारकाची मुहूर्तमेढ रोवली. कन्याकुमारीचे विवेकानंद स्मारक साकारणाऱ्या आणि महाबलीपुरम येथील स्थापत्य शास्त्र कॉलेजचे प्राचार्य असलेल्या श्री गणपती सत्पथी त्यांच्या खनपटीला अहोरात्र बसून या शि‍वस्मारकाचा सुंदर आराखडा बनवून घेतला.
या राष्ट्रीय स्मारकाचा तळमजला पंचाहत्तरशे स्क्वेअर फूट असून तेथे शस्त्रागारांची व चित्रकलेची अनेकदा प्रदर्शने भरविली जातात. पहिल्या मजल्यावरचा दहा हजार स्क्वेअर फुटांचा दरबार हॉल केवळ नावातच नव्हे तर प्रत्यक्ष रूपात 'दरबार हॉल' आहे. या स्मारकाची उंची ब्याऐंशी फूट असून वरच्या नक्षीदार घुमटाची उंची अठ्ठेचाळीस फुटांची आहे. या मंडळींनी मुंबईत येऊन जे. जे. स्कूल ऑफ आर्टसच्या प्रोफेसर एन. पी. खानविलकरांना गाठले होते. त्यांच्याकडून शि‍वरायांचा सिंहासनाधिष्ठित बारा फूट उंचीचा ब्राँझचा सुंदर पुतळा घडवून घेतला. तो चार फुटी चबुतऱ्यावर बसवला गेला आहे. त्या दरबार हॉलमधील शिवपुतळ्याच्या आजूबाजूचे भव्य खांब, वरचा देखणा छत, अनेक धातूंतून बनवलेले पुढचे दोन खूर उंचावत दिमाखात उभे ठाकलेले बारा अश्व हा स्फूर्तीदायी प्रकार मुळातून पाहण्यासारखा आहे. दरबार हॉलच्या चारी भिंतीवर शिवचरित्र कथन करणारी सुमारे साठहून अधिक भव्य रंगीत चित्रे आहेत. त्या प्रत्येक चित्राखाली अभ्यागतांसाठी इंग्रजी, हिंदी ‌आणि तेलगु‌मध्ये त्या त्या प्रसंगाची नेमकी आणि नेटकी वर्णने केली आहे.
गोवळकोंडा जिंकून, राजांनी मार्च १६७७ मध्ये भागानगर (आताचे हैदराबाद) सोडले. ते तिरुपती मार्गे जिंजीकडे (आताच्या तामिळनाडूमध्ये) निघाले. तेव्हा त्यांच्या सोबत वीस हजारांचे घोडदळ आणि तीस हजार पायदळ अशी चतुरंग सेना होती. आत्माकपूरच्या तळावर आपला मुख्य फौजफाटा ठेवून ते मर्यादित सड्या फौजेनिशी मलय पर्वतावरील श्रीशैलमकडे आले. बाजूच्या नदीमध्ये स्नान करून शिवरायांनी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. एप्रिल १६७७ मध्ये राजांचा तिथे सलग नऊ दिवस मुक्काम होता. तिथला निसर्गदेवतेचा अजब नजारा पाहून राजे इतके प्रसन्न आणि प्रभावित झाले की, त्यांनी हा दुसरा कैलासच आहे असे धन्योद्गार काढले. आज हैदराबादवरून श्रीशैलम दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे. पाऊणशे किलोमीटर प्रवास केल्यानंतर नीलपर्वताच्या मोठ्या रांगा आणि दुतर्फा घनदाट राखीव जंगल लागते. श्रीशैलम जवळ येताच अचानक घोड्यावरून खाली उडी ठोकावी तशी एक खोलगट दरी लागते. तेथेच श्रीशैलसागर हे धरण डोंगराच्या खोबणीमध्ये बांधले गेले आहे. ते पार केले की उंचवट्यावर श्रीशैलम लागते.
आजसुद्धा इथली निसर्गराजी मनाला भुरळ घालते. तो शांत आणि पवित्र परिसर पाहून शिवरायांना विरक्ती आली होती. शिवरायांनी त्या प्राचीन मंदिराच्या उत्तरेस स्वखर्चाने एक भव्य गोपुरम बांधून कढले आहे. त्याचा 'शिवाजी गोपुरम' असा आज उल्लेख केला जातो. ह्याच चिरेबंदी भव्य कमानीतून कार्तिक महिन्यामध्ये दीप पूजनासाठी भाविक मंदिरामध्ये प्रवेश करतात. राजांच्या आगमनापूर्वीच त्यांच्या अनुयायांनी तेव्हा याच परिसरात घाईने एक 'ध्यानमंडपम्' नावाची टोलेजंग वास्तू बांधून काढली होती. ती कालौघात पडून गेली आहे. मात्र त्या ध्यान मंदिराचे एक जुने छायाचित्र शिवाजी स्फूर्ती केंद्राकडे उपलब्ध आहे. आता तसेच ध्यानमंदिर नव्याने बांधायचा या मंडळींनी संकल्प सोडला आहे.
शि‍वस्मारकाच्या शेजारीच आवारात स्मारक समितीने 'शिवाजी अतिथी भवन' नावाचे तीन मजली मोठे गेस्टहाऊस बांधले आहे. त्यामध्ये साठ खोल्यांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. आवारात एक सुसज्ज ग्रंथ विक्री केंद्र, आयुर्वेदिक औषधींचे प्रदर्शन अशा बऱ्याच सोयी आहेत.
शि‍वराय आणि त्यांचे सुपुत्र संभाजी व राजाराम या तिघांनीही दक्षिणेत कोलार, चिकमंगळूर, जिंजी, तंजावर, बेंगलोर ते त्रिचन्नापल्ली अशा विस्तीर्ण भूप्रदेशात तलवार गाजवली होती. औरंगजेब पाच लाखाची फौज घेऊन महाराष्ट्राच्या छाताडावर बसला होता. तेव्हा स्वराज्य वाचवण्यासाठी शि‍वपुत्र राजाराम गोसाव्याचे रूप घेऊन सातशे मैल दक्षिणेत चालत गेले आणि आजच्या चेन्नई जवळ जिंजी येथे त्यांनी राज्य स्थापन केले हा वास्तव इतिहास आहे. शिवरायांचे महाराष्ट्रात कुठे नाही असे भव्य स्मारक दक्षिणेत व्हावे ही खूपच मंगलमय घटना आहे.
शि‍वरायांनी स्वखर्चाने गरीब यात्रेकरूंसाठी श्रीशैलम येथे अन्नछत्र बांधले होते. ते पुढे अनेक दशके सुरू होते. येथील नलमलाई पर्वतातील चांचू वनजमातींची अनेक गीते मी ऐकली. त्यामध्ये शिवरायांच्या श्रीशैलम भेटीचा गौरव आहेच.
दूर श्रीशैलमच्या जंगलातील शिवरायांचा तो दरबार पाहून मी जेव्हा बाहेर पडत होतो तेव्हा आमच्या भग्न रायगडाभोवतीची कावल्याची ऐतिहासिक खिंड, कोकण दिवा, लिंगाणा ही गिरीशिखरे आणि किल्ले माझ्या मनाभोवती गर्दी करत होती. शिवरायांच्या रायगडाचा जिर्णोद्वार बाजूला राहू दे किमान आजची गडावरची दुरवस्था तरी कधी संपणार आहे, हा मेलेला महाराष्ट्र रायगडासाठी तरी कधी जागा होणार आहे असे प्रश्न ते सर्वजण मला विचारीत होते.
महाराष्ट्र सरकारचे बहुचर्चित शि‍वस्मारक कधी पूर्ण व्हायचे असेल ते होवो. परंतु निस्सिम शिवभक्तीच्या ध्यासातून आणि कष्टत्यागातून आम्ही श्रेष्ठ असे राष्ट्रीय शिवस्मारक बांधू शकतो. इतिहासकारांच्या फळीला किंवा एखाद्या शासकीय कमिटीला न जमेल असे संपूर्ण सेतू माधवराव वाङ्मयाचे प्रकाशन करू शकतो, याचे अद्वितीय उदाहरण दूरदेशीच्या तेलुगु बांधवांनी घालून दिले आहे. मी इतिहासाच्या वेड्या शोधापायी आजच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेल्या अटकेपर्यंत जाऊन आलो आहे. मात्र श्रीशैलम येथील शिवस्मारकासारखे शि‍वरायांचे अन्य भव्य स्मारक मला तरी कोठेही पहावयास मिळाले नाही. ते निर्माण करणाऱ्या शि‍वप्रेमी तेलुगु बांधवांना मानाचा मुजरा!!
http://maharastrawonderbynikhilaghade.blogspot.com